

यवतमाळ : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पतीचा गळा आवळून खून करणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकरास जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि.१०) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. रामगडीया यांनी निकाल दिला.
सुमन उर्फ बाली यादव (वय ३०, रा. मधुकर नगर) आणि शैलेंद्र खिल्लारे, असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मूळ हरियाण्यातील सतपालसिंग उर्फ बबलू सूरजसिंग यादव २५ वर्षांपासून पुसद येथे वास्तव्यास होते. पत्नी सुमनचे स्थानिक युवक शैलेंद्र खिल्लारे याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान, अनैतिक संबंधाची माहिती सतपालसिंग यांना झाली असता, त्यांनी पत्नीला समज दिली. मात्र, पती प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरविले.
१६ ते १७ जून २०१७ च्या मध्यरात्री सूमन आणि शैलेंद्र यांनी सतपालसिंगचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर शैलेंद्र घटनास्थळावरून फरार झाला, तर सुमनने रडत बसल्याचे नाटक रचले. मात्र, मृताचा भाऊ विजयपाल यादव यांना त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती असल्याने त्यांनी वसंत नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर यांनी केला. खुनाच्या गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली होती. दरम्यान, पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. सरकारी पक्षाचे वकील अॅड. रवी रूपुरकर यांनी एकूण ११ साक्षीदारांचे नोंदवत पुरावे सादर केले. त्यावरून दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला. तर दंड न भरल्यास आणखी एका वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.