

यवतमाळ : पत्नीचा छळ करून तिला जिवंत जाळून ठार मारणाऱ्या पतीस पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राहुल विशाल मरसकोल्हे (वय २८) असे या आरोपीचे नाव असून, तो झरी तालुक्यातील शिबला येथील रहिवासी आहे.
याबाबत अधिक माहिती माहिती अशी, १८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी राहुल मरसकोल्हे हा पत्नीने भाजी लवकर बनविली नाही, म्हणून संतापला. याच रागातून त्याने घरी दिवा लावण्याकरिता आणून ठेवलेले डिझेल पत्नीच्या अंगावर ओतले त्यानंतर पेटत्या दिव्याची वात तिच्या अंगावर फेकून तिला पेटवून दिले. दिव्यातील डिझेलही तिच्या अंगावर टाकले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. परंतु, गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी राहुल विशाल मरस्कोले याला अटक करून त्याच्याविरुद्ध पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. आरोपी राहुल मरसकोल्हे विरुद्ध सबळ पुराव्यानिशी पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अभियोग पक्षाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी एकूण नऊ महत्त्वाचे साक्षीदार तपासले. याप्रकरणी विद्यमान सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित देशमुख यांनी अभियोग पक्षाची बाजू ग्राह्य धरून आरोपीला कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच भादंविचे कलम ४९८ (अ) मध्ये तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल कवाडे यांनी काम पाहिले तर आरोपीचे वकील म्हणून अॅड सिद्धार्थ लोढा यांनी काम पाहिले.