यवतमाळ : विजेच्या धक्क्याने खेकडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू
दिग्रस तालुक्यातील खेकडी येथे पाण्याची मोटर सुरु करत असताना विजेचा धक्का लागुन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मोटार सुरू करताना पोलजवळील उघड्या वायरला स्पर्श झाला. यावेळी विजेचा जोरदार धक्का लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.26) सायंकाळी घडली. दिलीप लक्ष्मण पवार ( वय. ५०, रा. खेकडी) असे मृतकाचे नाव आहे.
दिलीप हे ग्रामपंचायत खेकडी येथील पाणीपुरवठ्याच्या कामावर कार्यरत होते. खेकडी शेत शिवारातील बळीराम लिंबाजी राठोड यांच्या शेतातील मोटार पोलजवळ पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ते गेले होते. यावेळी उघड्या वायरचा डाव्या पायाला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दिलीप पवार यांना दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात शैलेश झंझाळ व साहेबराव बेले करीत आहेत.