विदर्भ
यवतमाळ : जादूटोणा केल्याच्या संशयावरून युवकाचा खून
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून पुसद येथील एका युवकाचा भरचौकात निर्घृण खून करण्यात आला. पुसद शहरातील सुभाष चौकात शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेने सगळीकडे एकच खळबळ माजली. या घटनेतील आरोपीचे रमेश वसंता पवार (वय ३८) असे नाव आहे.
अमोल तुकाराम धुळे (वय ३५) असे मृत युवकाचे नाव आहे. पुसद येथील शिवाजी वार्ड मधील तो रहिवासी होता. घराशेजारी राहणाऱ्या रमेशला अमोल हा जादूटोणा करतो असा संशय होता. या कारणास्तव रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अमोल हा दुकानातून आपले काम आटोपून घरी परत जात असताना रमेशने अमोलच्या मांडीवर व गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून त्याचा खून केला.
या घटनेनंतर आरोपी रमेळ हा घटनास्थळावरून पसार झाला. तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक राजू खांदवे व त्यांच्या पथकाने एका तासाच्या आत आरोपीस पकडून ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध पुसद शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
हेही वाचा