वर्धा : 'स्वच्छता ही सेवा २०२४' हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीमध्ये राबविण्याबाबत केंद्र सरकारच्या सूचना आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून या अभियानाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली. आज मंगळवारी सकाळी ७ वाजता दत्तपूर टी पॉइंट जवळील मुख्य रस्त्यावर असलेली कचऱ्याची घाण अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली. हाताने उचलता येईल दोन ट्रॅक्टर इतका प्लास्टिक कचरा हातात खराटे घेऊन अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने गोळा करण्यात आला व रस्त्याची स्वच्छता करण्यात आली.
अभियानात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) विठ्ठल जाधव, गटविकास अधिकारी संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
केंद्र सरकारच्या वतीने मागील दहा वर्षापासून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये 'स्वच्छता ही सेवा' हा पंधरवाडा विविध उपक्रम घेऊन राबविण्यात येतो. याही वर्षी सदर अभियान राबविण्याबाबत शासनाच्या सूचना असून, त्या अनुषंगाने आजपासून ते २ ऑक्टोबर म्हणजे, महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत विविध उपक्रम राबविण्याबाबत संबंधित यंत्रणेला जिल्हास्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहेत.
यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी "स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता" ही थीम निश्चित केली आहे. या मोहिमेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात १७ सप्टेंबरला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून अभियानाचा शुभारंभ करणे, १८ सप्टेंबरला सफाई- मित्र शिबिराचे आयोजन, १९ सप्टेंबरला अस्वच्छ ठिकाणाची कायमस्वरूपी स्वच्छता करणे, २० सप्टेंबरला गावातील खाऊ गल्लीच्या ठिकाणी निघणाऱ्या कचऱ्यांची लोकसभागातून स्वच्छता करणे, २१ सप्टेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे स्वच्छतेचे अनुषंगाने जनजागृती, २२ सप्टेंबरला एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती,
२३ सप्टेंबरला गृहभेटीद्वारे जनजागृती करून "एक झाड आईच्या नावे" उपक्रम राबविणे, २४ सप्टेंबरला तालुकास्तरावर स्वच्छता ज्योत, २५ सप्टेंबरला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, २६ सप्टेंबरला सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती, २८ सप्टेंबरला वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खतखड्डा व शोषखड्डा निर्मिती करणे, २९ सप्टेंबरला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करणे, ३० सप्टेंबरला स्वच्छतेचे वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व सुशोभीकरण करणे, १ ऑक्टोबरला स्वच्छता प्रतिज्ञा, तर २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार आहे.
आज जिल्ह्यात 'स्वच्छता ही सेवा' या अभियानाचा शुभारंभ प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबवून करण्यात आला. त्या अनुषंगाने आज सकाळी ७ वाजता जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) विठ्ठल जाधव, वर्धा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पाटील, तसेच वर्धा पंचायत समिती अंतर्गत ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः हातात खराटे घेऊन, दत्तपूर टी पॉइंटवरील मुख्य रस्त्यावर असलेल कचरा, प्लास्टिक कचरा स्वच्छता करण्याची मोहीम सुरू केली. सकाळी सात ते नऊ या दोन तासाच्या कालावधीमध्ये दोन ट्रॅक्टर इतका प्लास्टिक कचरा उचलून रस्ता स्वच्छ करण्यात आला. यावेळी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली.
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत उपक्रम ग्रामपंचायतने प्रभावीपणे राबवावे व या अभियानात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाधव यांनी केले आहे.