नागपूर : पुढारी वृत्तसेवा
एडेड माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथुन प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ लेखक भालचंद्र देशपांडे यांचे आज (रविवार) 13 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे (वय 83) होते. ते 41, द्रोणाचार्य नगर, नागपूर येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी वृंदा, मुलगा श्रीकांत, सून अंजली, मुलगी प्रतिमा भोपळे, जावई डॉ. संजीव भोपळे, नातवंड व बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनेक नामवंत मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांमध्ये त्यांनी कथा, शैक्षणिक व वैचारिक लेख असे विपुल लेखन केले. आकाशवाणीवर त्यांची अनेक बालनाट्ये व नभोनाट्ये प्रसारित झाली. त्यांचे अनेक कादंबरी, बालकथा संग्रह प्रकाशित झाले असून त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालसाहित्यामधील स्पृहणीय योगदानासाठी त्यांचा सत्कारही करण्यात आला.