

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल- नरखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उमेदवार बदलणार अशी चिन्हे आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उमेदवारी यापूर्वीच पक्षनेते शरद पवार यांनी जाहीर केली असली तरी आता अनिल देशमुख यांचे सुपुत्र युवा नेते जि. प.सदस्य सलील देशमुख हे सोमवारी (दि.२८) आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे पिता पुत्रात नेमके तुतारी कोण वाजविणार हे लवकरच उघड होणार आहे.
बाजार समिती काटोल येथे सोमवारी (दि.२८) सकाळी ११ वाजता एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सलील देशमुख हे काटोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 'डायरी ऑफ ए होम मिनिस्टर,' या पुस्तक निमित्ताने माध्यमांशी बोलताना स्वतः अनिल देशमुख यांनी येत्या दोन दिवसात मी लढणार की, सलील हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे आता सलील देशमुख अर्ज भरणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
भाजपने या मतदारसंघात चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिल्याचे समजते. दरम्यान, देशमुख यांचा यापूर्वी पराभव करणारे त्यांचे पुतणे माजी आमदार डॉ आशिष देशमुख काटोल तसेच सावनेर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनी आपला प्रचारही सुरू केला होता मात्र आता काटोल मधून संधी न मिळाल्यास त्यांना सावनेरमध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार यांच्या विरोधात लढावे लागू शकते. भाजपचीही शहरातील मध्य ,पश्चिम, उत्तर मतदारसंघ व ग्रामीणमध्ये काटोल, उमरेड,सावनेर अशी सहा उमेदवार असलेली यादी आलेली नाही. उद्या सोमवारी ही यादी येण्याची शक्यता आहे.शेवटच्या क्षणी महायुती, महाविकास आघाडी उमेदवार बदलत परस्पर धक्के देण्याची शक्यता आहे.