नागपूर : पुढारी वृत्तसेवा
दररोज व नियमितपणे मेट्रो वापरणाऱ्या प्रवाशांची संख्या 1 लाखावर झाली आहे. असे असताना आता लोकाभिमुख सेवेच्या दृष्टीने महा मेट्रोच्या वतीने नागपूर मेट्रो स्थानकांवरील प्रसाधनगृह आता ‘टॉयलेट सेवा ॲप’ च्या माध्यमाने जाणून घेणे शक्य झाले आहे.(Nagpur Metro)
नागपूर मेट्रोच्या स्थानकांवर महिला, पुरुष व दिव्यांगजन यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. ‘टॉयलेट सेवा ॲप’ हे मोबाईल ॲप अमेरिका स्थित आयटी इंजिनियर अमोल भिंगे यांनी बनविले आहे. हे ॲप निशुल्क असून यामुळे महिला व वृद्ध नागरिक, विद्यार्थी आणि इतर नागरिक यांना प्रसाधनगृह शोधण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यासाठी टॉयलेट सेवा हे ॲप 'स्वच्छ प्रसाधनगृह' अशी मोहीम राबविण्यात येत आहे. याद्वारे प्रसाधनगृहातील नीटनेटकेपणा, स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, नळ व बेसिन यांच्यामध्ये काही बिघाड असल्यास तो या ॲपद्वारे संबंधित संस्थेपर्यंत तक्रार/सूचना या स्वरूपात पोहोचवणे सहज शक्य होणार आहे. तसेच संबंधित संस्थेने तक्रार निवारण केल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याचा अभिप्राय मिळणार आहे.
नागपूर मेट्रो आणि टॉयलेट सेवा यांच्या समन्वयामुळे नागपूर मेट्रोच्या प्रसाधनगृहांची अद्यावत माहिती नागरिकांना / प्रवाशांना जाणून घेता येईल. तसेच प्रसाधनगृहांच्या संबंधीची तक्रार / सूचना ॲपद्वारे नोंदविता येणार आहे. टॉयलेट सेवा ॲप हे प्लेस्टोअर आणि आयओएसच्या माध्यमाने डाउनलोड करू शकता किंवा प्रसाधनगृह येथे उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून देखील डाउनलोड करू शकता.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो