नागपूर -काँग्रेसने नेहमीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध केला. मात्र, भारतात संविधान आहे आणि भारतात भाजप सत्तेत आहे तोवर आरक्षणाला कुणीही हात लावू शकणार नाही असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दिशाहीन विरोधकांचे भवितव्य अंधकारमय असल्याचा आरोप केला. मोठ्या शक्तिप्रदर्शनासह भाजपने आज नागपूरात तीन मतदारसंघातील नामांकन भरले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ते दक्षिण पश्चिम मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
मला सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आभार मानतो. गेली 25 वर्षे लोकांनी माझे काम बघितले. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येईल. लाडकी बहिण व इतर योजनेमुळे शिंदे सरकारला जनता आशीर्वाद देईल.
विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महायुती सत्तेत येईल. नागपुरातील सर्व जागा आम्ही जिंकू असा दावा केला. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची प्रगतीची गती कायम राखण्यासाठी जनता आमच्यासोबत असल्याचे निकालात दिसेल.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या आरक्षण संदर्भात भूमिकेचे समर्थन केल्याबाबत बोलताना पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी देखील तीच भूमिका पुढे नेत आहेत. पटोले हे त्यांचेच चेले आहेत. जनतेला सर्व कळून चुकले आहे. ते माझे मित्र आहेत नाहीतर मी पण कुठल्या सर्कसचे आहेत ते सांगितले असते असे उत्तर पटोले यांच्या टीकेला दिले
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुस्तकाबाबत छेडले असता अशा डायऱ्यानी काहीही होत नाही. डायरी काय कुणीही लिहितो, मनाने कादंबरी कुणीही लिहितील त्याला अर्थ नाही.
मुळात हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट काय निरीक्षण नोंदवले ते महत्त्वाचे, शेवटी कोण काय म्हणतो यापेक्षा न्यायालयाने काय म्हटले ते महत्वाचे आहे. ते तुम्ही वाचून बघा असेही फडणवीस म्हणाले.