

नागपूर : काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी भाजपमध्ये येण्याचा विचार करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. सोबत गेलो तर किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देऊ शकतो अशी काँग्रेस पक्षातील नेत्यांची, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्थिती आहे, असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शुक्रवारी केला.
याचवेळी नाना पटोले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. पटोले यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण करण्यात काही तथ्य नाही. नाना पटोले भाजपच्या संपर्कात नाहीत. ते निष्ठावान काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत असे त्यांनी सांगितले.
मात्र, काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही चर्चा करत नाही कोण कुठे आहे याची माहिती काँग्रेसला नाही. चांगले पदाधिकारी बाजूला पडलेले आहेत. पक्ष आणि नेत्यातील संवाद यात फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे. कोण कार्यकर्ता आपले आयुष्य खराब करेल म्हणून मोठमोठे नेते काँग्रेसच्या विसंवादाला कंटाळलेले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. मागच्या एका वर्षात विरोधी पक्षाने विकासावर चर्चा करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितलेली नाही. फक्त निवेदन दिले. अतिवृष्टी संदर्भात नौटंकी केली. विरोधी पक्षाने पाच वर्ष शेवटच्या व्यक्ती करता सरकारला धारेवर धरणे वारंवार सरकारकडे जाणे आपल्या भूमिका मांडणे हे अपेक्षित आहे असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.