नागपूर : राजेंद्र उट्टलवार
विदर्भातील 62 जागांपैकी किमान 50 जागा महाविकास आघाडी नक्कीच जिंकेल. राज्यात आमचे सरकार येईल. कुठल्याही जागांसाठी एकमेकांचे पाय ओढायचे नाहीत हे आमचे नक्की ठरले आहे. कोण कुठल्या जागा लढणार हे आपण एकत्र निर्णय घेऊ असे शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी आज (रविवार) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
राऊत म्हणाले, मला वाटते विदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आमची शिवसेना या ठिकाणी एकत्रित बसून या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. येत्या 20 आणि 21 ऑगस्ट रोजी मविआच्या बैठकांना सुरूवात होत आहे. त्यामध्ये विभागवार जागांवर चर्चा होईल असे सांगितले. एकाचवेळी चार राज्यात निवडणूक घेता येत नाही, वन नेशन वन इलेक्शन बोलतात, निवडणूक आयोगालाही खोके दिलेत का, आयोग बोलण्याऐवजी नेते कधी निवडणूक होणार हे बोलताहेत असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
शिवसेना नागपुरातील एक आणि रामटेक विधानसभा अशा दोन जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विदर्भातील शरद पवार गटाने शनिवारी पूर्व नागपूर, काटोल, उमरेड, हिंगणा अशा चार जागांची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी आपले सुपुत्र कुणाल राऊतसह 50 टक्के युवकांना संधी देण्याची मागणी केली आहे. एकंदरीत मविआतही परस्परांच्या जागांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.