

Leopard in Wardha Road
नागपूर: वर्धा रोडवरील मिहान परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. शुक्रवारी लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी रात्री हा बिबट्या अडकला. टीसीएस कंपनी परिसरात हा बिबट्या असल्याची माहिती पुढे आली आहे.
बिबट्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले, त्यामुळे नोकरीवर जाणाऱ्या युवक युवतींमध्ये दहशत निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी पालकांच्या दबावामुळे शुक्रवारी दिल्ली पब्लिक स्कूलने सुट्टी दिली होती. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारपासून पिंजरा लावण्यात आला होता, परंतु, सतत जागा बदलत असल्यामुळे त्याला पकडणे शक्य होत नव्हते.
शनिवारी रात्री या बिबट्याला निसर्ग मुक्त करण्यात आले. मिहानमधील कंपन्यांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमची मागणी केली होती. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने खबरदारीचे आवाहन केले होते. प्रादेशिक उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या घटनास्थळाला भेट दिली.