नागपूर हादरले! हॉटेल मालकाची गोळ्या झाडून हत्या, चार आरोपी फरार
नागपूर : पुढारी वृत्तसेवा; मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हॉटेल मालकाची दोन दुचाकींवरून आलेल्या चार संशयित आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना आज (मंगळवार) पहाटे उघडकीस आली. या घटनेतील चारही संशयित आरोपी फरार असून पोलिसांच्या विविध पथकांमार्फत त्यांचा शोध घेतला जात आहे.
अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना 15 एप्रिल रोजी मध्यरात्री 1.20 ते 1.30 वाजता घडली. निंबस कॅफेसमोर सोशा रेस्टारेंट मालक अविनाश राजू भुसारी (वय 28 वर्ष) हे निंबस कॅफेचे मॅनेजर आदित्य यांच्यासोबत दोघे बसून आईस गोला खात होते. यादरम्यान 4 संशयित आरोपी इसम हे मोटरसायकल तसेच पांढऱ्या रंगाची मोपेड यावर डबल सीट बसून आले व त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून अविनाश राजू भुसारी (वय 28 वर्षे) यांच्यावर गोळीबार केला व तिथून पळून गेले.
गंभीर जखमी अविनाश यांना तातडीने खासगी इस्पितळ वोकहार्ट हॉस्पिटल येथे भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृतकाचे वडील राजू भुसारी यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात आता पोलीस या रेस्टॉरंट व परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहत आहेत. मात्र, कुठलाही वाद न करता संशयित आरोपींनी थेट येऊन गोळीबार केल्यामुळे वैमनस्यातून हा प्रकार घडला की, सुपारी किलिंगचा प्रकार आहे या संदर्भात आता पोलीस तपासाचे आव्हान आहे. हा परिसर मध्यरात्री सुद्धा वर्दळीचा असल्याने या घटनेने आता उपराजधानीतील उच्चभ्रू वस्तीमध्येदेखील रात्रीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

