

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
कुरिअरने घरपोच नियमित उपयोगी वस्तू सोबतच आता गांजाची तस्करी देखील होऊ शकते अशी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन गुन्हेगारांना नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने 22 किलो गांजासह अटक केली आहे. प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयताळा रोडवरील कुरिअर कंपनीत हा प्रकार घडला. या कारवाईत कारसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
हे सराईत गुन्हेगार कुरिअर कंपनीच्या माध्यमातून ओरिसा येथून पार्सलद्वारे गांजा मागवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी एक्स्प्रेस बिझ नावाच्या कुरिअर कंपनीच्या कार्यालयाबाहेर पार्सल घेऊन बसलेल्या दोन आरोपींना अटक केली. करण पोथीवाल रा. मानेवाडा आणि शाहरुख करीम खान रा. बडा ताजबाग अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी हे पार्सल घेऊन कारमधून पुढे जाण्यापूर्वीच पोलिस पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे 22 किलो गांजा, तीन मोबाईल फोन आणि एक कार आणि सुमारे 6.5 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना अजिंक्य नावाच्या अन्य एका आरोपीला माल पोहोचवल्याचे सांगितले. यानुसार पोलिसांनी इतर आरोपींचा देखील शोध घेण्यास सुरुवात केली असून लवकरच मोठी टोळी ताब्यात येण्याची शक्यता आहे.