नागपूर : पुढारी वृत्तसेवा
मुळात ज्याला पिस्तुलचे ज्ञानच नाही तो पिस्तुल हिसकावून गोळीबार करू शकत नाही. आरोपीला तळोजावरून मुंब्रा नेताना मार्ग का बदलला, हे संशयास्पद आहे. पीडित कुटुंब FIR साठी पोलीसात गेले असताना 5 दिवस ती घेतली नाही ही वस्तुस्थिती असून, केवळ भाजप नेता शिक्षण संचालक असल्याने आपटेला वाचविण्यासाठी हा बनाव केला जातोय का? बापटला वाचविण्यासाठी एन्काऊंटर केले का? असे थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी आज (बुधवार) माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
बदलापूर घटनेची दोन दिवस सातत्याने चर्चा सुरू आहे. मी अनेक पोलिसांशी बोललो. पोलीस अधिकाऱ्यांजवळ असलेल्या पिस्तुलला हुक असते. त्यामुळे कोणीही काढून गोळी मारेल असे होत नाही. कॉक केल्याशिवाय सिलेंडरमध्ये गोळी जात नाही. पिस्तुलमध्ये 13 बुलेट्स असतात, पण पोलीस 10 बुलेट ठेवतात. त्यांना प्रशिक्षणमध्ये तसे शिकविले जाते. एकंदरीत पोलीस अधिकारी पिस्तुलला लॉक करून ठेवतात. यामुळेच ट्रेनिंग घेतल्यावरच ह्या गोष्टी करता येतात याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.
या एन्काऊंटर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. दोषींना शासन व्हावे असे सर्वांनाच वाटते. राजकारण करण्याचा हा विषय नाही. कठोर शिक्षेसाठी शक्ती कायदा व्हावा यासाठी मी गृहमंत्री असताना आग्रही होतो. केंद्र सरकारकडूनच तीन वर्षे झाली तरी त्याला मंजुरी मिळाली नाही असा आरोप देशमुख यांनी केला.