नागपूर : लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला, सुरुवात आम्ही अन्नदात्या शेतकऱ्यांपासून केली. केंद्र सरकारचे ६ हजार व महाराष्ट्र शासनाचे ६ हजार असे १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सावरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील वृद्ध व्यक्तींना आधार देणारी मुख्यमंत्री वयोश्री आणि लाडक्या बहिणींसाठी योजना आणली. आपल्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. बांधकाम कामगारांसाठी आधार देणारी कल्याणकारी योजना आपण सुरू केली. लोकांच्या कल्याणाचा निधी लोक कल्याणाच्या भावनेतून त्यांच्या पर्यंत पोहचविणे व वंचितांना न्यायाच्या कक्षेत आणणे याला आम्ही प्राधान्य दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे सुमारे २ हजार कोटी रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारशिवनी मैदान येथे आयोजित समारंभात ते बोलत होते. आमदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल व मान्यवर उपस्थित होते.
मुख्यंत्री म्हणाले, गेल्या अडीच वर्षात शासनाने सर्वसामान्यांच्या व्यथा समजून घेतल्या. गोरगरिबांचे दु:ख ओळखले. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यातून सावरण्यासाठी आपण त्यांच्या बांधावर जाऊन एनडीआरएफ अंतर्गत भरीव मदत पोहचविली. कोणत्याही शासकीय योजनांसाठी दलालाची साखळी आपण ठेवली नाही. केंद्राचा, राज्य शासनाचा जो निधी आहे तो थेट लाभधारकांच्या खात्यात जमा होत आहे. या माध्यमातून राज्यातील जनतेने एक स्वच्छ पारदर्शी सरकारची प्रचिती घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे बाजारात खेळते भांडवल म्हणून वापरला जाऊ लागला आहे. या योजनेसमवेत लखपती दिदी योजनेसाठी आम्ही कटिबध्द आहोत. उमेद अंतर्गत महिला बचत गटांची संख्या आम्ही ६० लाखांवरुन १ कोटीपर्यंत लवकरच घेऊन जात आहोत. उमेदच्या अंतर्गत असलेल्या महिलांनाही अधिक भक्कम करु, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार आशिष जयस्वाल यांच्या कार्याचा त्यांनी आवर्जून गौरव केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संवाद साधला. विदर्भातील विविध विकास कामांसह सिंचनाच्या दृष्टीनेही आपण मैलाचा टपा गाठल्याचे सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत नागपूर वैनगंगा विकास खोऱ्यांतील सत्रापूर विकास योजनेच्या माध्यमातून सुमारे १० हजार एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. यासाठी १२३ कोटी रुपये राज्यशासनाने दिले आहेत. या योजनेतून जे पंपगृह आहेत त्याद्वारे रामटेक तालुक्यातील २४ गावांतील ६ हजार एकर क्षेत्राला सिंचन उपलब्ध होत आहे. विदर्भातील सिंचन क्षेत्राला न्याय देण्याकरीता आपण सातत्याने प्रयत्न केले. हा प्रकल्प अनुशेष निर्मुलनाचा एक भाग असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वैनगंगा-नळगंगा हा प्रकल्प विदर्भातील सिंचनाचे चित्र बदलविणारा प्रकल्प आहे. सुमारे ८७ हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहेत. यातून १० लाख एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल असे सांगितले.