महायुतीच्या जागावाटपापूर्वी शिंदे सेनाचा पहिला उमेदवार जाहीर ?
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : विधानसभा निवडणूक आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे, अशावेळी रामटेक विधानसभा क्षेत्रातून विद्यमान अपक्ष आमदार अॅड. आशिष जैस्वाल यांच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. राज्यात महायुतीचे जागावाटप होण्यापूर्वी शिवसेनेचा हा पहिला उमेदवार जाहीर झाला आहे. पारशिवनी येथे विविध विकासकामे भूमिपूजन, उद्घाटन निमित्ताने मुख्यमंत्री रामटेकमध्ये होते.
महायुतीत भाजप- शिवसेनेत रामटेकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असून गेल्यावेळी जैस्वाल अपक्ष लढून विजयी झाले. सुरुवातीला ते उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते. नंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटर्तीय झाले. यावेळी महायुती, मविआ संघर्षात त्यांचे तळ्यात मळ्यात सुरू होते. भाजपचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उघडपणे आशिष जैस्वाल, कृपाल तुमाने व शिवसेना विरोधात भूमिका घेत आपली दावेदारी सांगितली. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनीच आशिष जैस्वाल यांच्या नावाला हिरवी झेंडी दिली आहे.
भाजपच्या राजहट्टावरून लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना मुख्यमंत्र्यांनी तिकीट दिले होते. मात्र, ते पराभूत झाले. शिवसेनेचा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. उमरेडला त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा कायम असताना आता पुन्हा दगाफटका नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी रामटेकच्या निमित्ताने भाजपला पर्यायाने उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आचारसंहिता लागण्यापूर्वी हा 'सीटिंग गेटिंग'असा इशाराच दिल्याचे राजकीयदृष्ट्या बोलले जाते.
स्वतः जैस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून एकमताने आणि आपणच येथून जिंकू शकतो, हे लक्षात घेता आपली उमेदवारी जाहीर केल्याचा दावा केला आहे. अर्थातच हा दावा भाजप शिवसेनेतील हेव्यादाव्यात कितपत टिकाव धरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.