नागपूर; पुढारी वृत्तसेवा : हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीने विधिमंडळ सचिवालयाचे कार्यालय आजपासून (दि. २७) विधानभवनात सुरू होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वपक्षीय ठराव 8 डिसेंबर रोजी मांडण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले असले तरी तो कधी मांडायचा याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंगळवारी किंवा बुधवारी होण्याचे संकेत आहेत.
उपराजधानीत येत्या ७ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. तत्पूर्वी 1,2 डिसेंबरला मेडिकल, विद्यापीठ कार्यक्रमासाठी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु येत आहेत. या सर्व घडामोडीसाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. यंदा दोनच आठवड्याचे कामकाज असले तरी अधिवेशनात राज्यभर गाजणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याचे संकेत आहेत. ओबीसी मेळाव्यांनीही वातावरण तापले आहे. आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर ८ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सर्वपक्षीय ठराव मांडण्याचे आश्वासन सरकारने दिले. या अधिवेशनासाठी सचिवालयातील सुमारे दीडशे अधिकारी व कर्मचारी रविवारी सकाळी पोहचले. सुमारे साडेतीनशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दुसरा जत्था गुरुवार शुक्रवारी उपराजधानीत पोहोचेल. अधिवेशनानिमित विधानभवनासह राजभवन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मंत्री व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी आवश्यक व्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जीपीओ चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी बंगल्याचा मेक ओव्हर जोरात आहे. विविध विभागाची वाहने अधिग्रहित करणे सुरु झाले आहे. पुढील आठवड्यात ही वाहने नागपुरात पोहोचतील असे नियोजन आहे.