

नागपूर : एका चार वर्षीय चिमुकल्याचा स्कूल बसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना कळमेश्वरमधील महाजन लेआऊट परिसरात घडली. पार्थ पंकज कांडलकर असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पार्थची बहीण गार्गी सेंट जोसेफ स्कूल फेटरी येथे तिसर्या वर्गात शिकते. सकाळी नेहमीप्रमाणे पार्थच्या आईने गार्गीला घराजवळ उभ्या असलेल्या स्कूल बसकडे नेले. तेव्हाच पार्थ मागून धावत आला. चालकाचे त्याच्याकडे लक्ष नसल्याने बस सुरू करताच पार्थ बसच्या मागील चाकाखाली आला. या दुर्घटनेत पार्थच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला ताबडतोब कळमेश्वर येथील पोतदार मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पार्थ एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.