

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील टाकेझरी जंगल परिसरात गोंदिया जिल्हा पोलीस व सी-६० पथकाने सर्च ऑपरेशन राबविले. ज्यामध्ये पोलिसांनी पहाडावरील दगडांमध्ये लपवून ठेवलेले विस्फोटक साहित्य जप्त केले असून नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल गतिविधीवर आळा घालण्याकरिता जिल्ह्यातील कार्यरत सी-६० पथके, सशस्त्र दूरक्षेत्र, नक्षल प्रभावित भागातील पोलिस ठाणे प्रभारी यांना प्रभावीपणे जंगल अभियान, सर्च पेट्रोलिंग करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी दिले आहे. या अनुषंगाने गुरुवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात सी- ६० पथक, सालेकसा पोलिस, बी.डी.डी.एस.पथक, श्वान पथक, ऑपरेशन सेलने टाकेझरी जंगल परिसरात एस. आर. सर्च पेट्रोलिंग केले.
यावेळी पेट्रोलिंग पथकास टाकेझरी जंगल परिसरातील पहाडावरील दगडांच्यामध्ये आक्षेपार्ह साहित्य लपवून ठेवले आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली. यावरून शहानिशा केली असता टाकेझरी जंगल परिसरातील पहाडावरील दगडांच्यामध्ये एका पारदर्शी प्लास्टीक पॉलिथीनच्या तुकड्यामध्ये आक्षेपार्ह विस्फोटक साहित्य दिसून आले. सदर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये ४ बंडल इलेक्ट्रीक वायर, १८ फुट लाल रंगाचे कॉर्डेक्स, २ कि. ग्रॅम पांढरे युरीया सारखे दानेदार पदार्थ, गडद हिरव्या व सिल्वर रंगाचे सेमी सॉलीड डिझेल सारखा वास येणारा पदार्थ, १२ व्होल्ट बॅटरी, ५ लीटर क्षमतेचा अॅल्युमिनीयम कुकर, जिलेटीनच्या कांड्या तीन नग प्रत्येकी १२५ ग्रॅम, तीन प्लग, इलेक्ट्रीक डेटोनटर सदृस्य वस्तु, दोन नग पॅकींग टेप, अंदाजे ५ ते ७ से.मी. लांबीचे लहान मोठे एकुण ५२ नग लोखंडी खिळे, अंदाजे अर्धा से.मी. ते ४ से.मी. आकाराचे धारदार व नोकदार लहान मोठे एकुण ७८ नग लोखंडाचे तुकडे, जाड काचेचे धारदार व नोकदार ओबडधोबड आकाराचे एकुण १९० नग लहान मोठे तुकडे असे आक्षेपार्ह विस्फोटक साहित्य मिळुन आले आहेत.