गोंदियाचा धोकादायक गुंड चंद्रपुरात स्थानबद्ध

जिल्हा पोलीस प्रशासनाची एमपीडीए कायद्यान्वये कारवाई
Police arrested Gondia dangerous gangster in Chandrapur
गोंदियाचा धोकादायक गुंड चंद्रपुरात स्थानबद्धFile Photo
Published on
Updated on

गोंदिया : पुढारी वृत्तसेवा

गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोकादायक गुंडाला जिल्हाधिकारी, तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या २६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या आदेशानुसार एम.पी. डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये (दि. २८) एका वर्षाकरीता चंद्रपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पंकज उर्फ मोनु गोविंद अग्रवाल ( वय ३६ रा. बसंतनगर, गोंदिया असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.

पंकज उर्फ मोनू अग्रवाल याच्या विरूध्द जिल्ह्यातील रामनगर, रावणवाडी, डुग्गीपार पोलीस ठाण्यात खून, दरोडा, चोरी विविध गंभीर गुन्हे दाखल असून आगामी नवरात्रोत्सव सण व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्या अनुषंगाने रामनगरचे पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे यांनी सदर आरोपीच्या विरोधात एमपीडीए कायद्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्फत पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवला होता. दरम्यान, प्रतिबंधक सेलद्वारे सदर प्रस्ताव गोंदियाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना मंजुरी करीता सादर करण्यात आले होते. यावर, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी या प्रस्तावातील नमूद सराईत धोकादायक गुंड पंकज उर्फ मोनू याच्याविरूद्ध एम.पी.डी.ए. कायद्याचे कलम ३ (१) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यानुसार आरोपी पंकज उर्फ मोनू यास २८ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथील मध्यवर्ती कारागृहात १ वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

१४ गंभीर गुन्ह्यांची नोंद...

संशयित आरोपी पंकज उर्फ मोनु गोविंद अग्रवाल या धोकादायक गुंडाविरूध्द गोंदिया जिल्ह्यातील रामनगर, रावणवाडी, दवनीवाडा, डूग्गीपार पोलीस ठाण्यात विविध १४ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने खून, खोटे दस्ताऐवज तयार करुन ठगबाजी करणे, शासकीय कामकाजात उपयोगी येणारे नकली मोहर बनविणे, चोरी करणे, रेतीचे अवैध उत्खनन करुन चोरी, अवैद्यरित्या गांजा बाळगणे व विक्री करणे, दरोडा, खंडणी मागणे, अवैद्यरित्या शस्त्र बाळगणे, अवैध शस्त्र पुरविणे आदी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

काय आहे एमपीडीए कायदा...

महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एम पी. डी. ए. कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अँक्टिविटी) आहे. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एम. पी. डी.ए. ची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news