गोंदिया, पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील येळमागोदी येथे झोपेत असलेल्या मायलेकींना विषारी सापाने दंश केल्याने दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना (रविवार) मध्यरात्रीनंतर घडली. कमळाबाई सुखीराम उसेंडी (वय ३०) रा.येळमागोदी, मंजु सुखीराम उसेंडी (वय ६) रा. येळमागोदी असे मृत मायलेकींची नावे आहेत.
कमळाबाई व तिची सहा वर्षीय चिमुकली मंजु हे दोघे जवळ-जवळ झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री २ वाजण्याच्या सुमारास विषारी सापाने दोघीना दंश केला. यावेळी कुटूबीयांनी त्यांना उपचारासाठी जवळच्या चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, कमळाबाईची प्रकृती गंभीर असल्याने तिला लगेच गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तर मंजुवर चिचगडच्या ग्रामीण रूग्णालयातच उपचार सुरू करण्यात आले. परंतू, उपचारदरम्यान दोन्ही मायलेकींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिचगड परिसरासह येळमागोदी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.