गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोदरा-देऊळगाव येथील कक्ष क्रमांक 307 राखीव जंगलात पट्टेदार वाघाने एका गायीची शिकार केल्याची घटना मंगळवारी (ता.6) सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
निमगाव येथील मनोहर झिंगाजी चचाने यांनी आपली गाय चारण्यासाठी जंगल परिसरात सोडली होती. यावेळी गाय राखीव जंगल कक्ष क्रमांक 307 मध्ये गेली. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने गायीवर हल्ला करून तिला ठार केले. यामध्ये शेतकरी मनोहर चचाने यांचे 40 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती स्थानिक वन विभागाला देण्यात आली. दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक भोगे, वनरक्षक माधुरी लुचे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, शेतकरी मनोहर चचाने यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.