गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील भुताईटोला (पाथरी) येथे तलावात आंघोळीसाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी ( दि. २९) दुपारच्या सुमारास घडली. छबीकुमार उर्फ लकी हरिणखेडे (वय १५ रा. भुताईटोला ता. गोरेगाव) असे या मृत मुलाचे नाव आहे.
लक्की हा शिक्षणासाठी भुताईटोला येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो गावातील बोडीवर (तलाव) आंघोळ करण्यासाठी गेला होता. दरम्यान, आंघोळ करतेवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व स्थानिक ढिवर समाज बांधवांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.