गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांच्या मुलीमध्ये राजकीय वैर असल्याचे चित्र दाखवणं म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राची सत्ता आपल्याच घराण्याकडेच राहावी, यासाठी धर्मरावबाबा, भाग्यश्री आत्राम आणि अम्ब्रिशराव आत्राम यांची धडपड सुरु आहे. हे लोक खोकेबाज आणि धोकेबाजही आहेत, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. आज (दि.२९ सप्टेंबर) अहेरी येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते. (Maharashtra Politics)
अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलगी भाग्यश्री आत्राम आणि जावयाला नदीत बुडविण्याची भाषा केली. त्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करुन धर्मरावबाबांना खुले आव्हान दिले. हाच धागा पकडून वडेट्टीवार म्हणाले की, ‘तू मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे करतो, असा हा प्रकार आहे. (Maharashtra Politics)
लोकसभा निवडणुकीत एका काका, पुतण्या आणि मुलगी सर्वच एका बाजूला असताना काँग्रेसला अहेरी विधानसभा क्षेत्रात १२ हजारांचं मताधिक्य मिळालं. मागील ४० वर्षांपासून अहेरीची सत्ता राजघराण्याच्या ताब्यात असतानाही या क्षेत्राचा विकास झाला नाही. रस्त्याची अवस्था बकाल आहे. रुग्णवाहिका नाही म्हणून रुग्णाला खाटेवर झोपवून आणावं लागतं, दवाखान्यात डॉक्टर आहे, तर परिचारिका नाही. कुठे औषध आहे, तर रुग्णवाहिका नाही. याला कुणी विकास म्हणत असतील तो पाहायची काँग्रेसची इच्छा आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. अहेरी क्षेत्राचा विकास करण्यासाठी आम्ही ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी हायकमांडला विनंती करु. नाही मिळाली तर मैत्रीपूर्ण लढत देऊ, असेही त्यांनी जाहीर केले.
वडेट्टीवारांनी लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारवर टीका केली. तूर डाळ दोनशे रुपये किलो झाली. खाण्याचे तेल १३५ रुपयांवर नेऊन सरकारने भगिनींची फोडणी महाग केली. एकीकडे सरकारच्या तिजोरीतून दीड हजार रुपये द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याकडूनच पैसे वसूल करायचे, असा हा प्रकार आहे. नागपूरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना तुमच्या खात्यात पैसे जमा झाले काय, अशी विचारणा केली. मात्र, तुम्ही सुरक्षित आहात काय, असे विचारले नाही. राज्यात खुलेआम वसुली केली जात आहे. सर्व सरकारी उद्योग आणि मूल्यवार जमिनी अदानीला विकल्या जात आहेत. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली जात आहे. संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे; परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे दलित, आदिवासी आणि ओबीसींचं संरक्षण करणारं आहे. त्याचं रक्षण करा, असे आवाहन करुन वडेट्टीवार यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा केला. यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, हनुमंतू मडावी, माजी आमदार पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी यावेळी उपस्थित होते.