गडचिरोली,ता.२८: एटापल्ली तालुक्यातील करपनफुंडी गावातील वृद्ध महिलेचा मृतदेह नदीत आढळला होता. आता यानंतर सोमवारी बुधवारी (दि.28) काही अंतरावर तिच्या पतीचाही मृतदेह आढळून आला आहे. मालमत्तेच्या वादातून दोघांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून,पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रैनू जंगली गोटा (वय.६०) आणि बुर्गो रैनू गोटा(वय.५५) असे मृत दांपत्याचे नाव आहे.
करपनफुंडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील जांभिया आणि बांडे या दोन नद्यांच्या संगमानजीकच्या शेतावर असलेल्या झोपडीत ते राहत होते. परंतु शनिवारपासून दोघेही बेपत्ता होते. मंगळवारी(दि.२७) सकाळी १० वाजताच्या सुमारास नदीत बुर्गो गोटा या महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर बुधवारी (दि.28) काही अंतरावर रैनू गोटा याचाही मृतदेह आढळून आला. सुरुवातीला गोटा यांच्या नातेवाईकांनी जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांचीही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. परंतु पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मालमत्तेच्या वादातून दोघांची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. परंतु जादुटोण्याचा प्रकार असल्यास त्याही बाजूने पोलिस तपास करतील, असे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.