Gadchiroli News | शाळेच्या परिसरात मुलीचा संशयास्पद आढळला मृतदेह

कुरखेडा येथील घटनेने खळबळ
Gadchiroli girl suspicious death
कुरखेड्यात मुलीचा संशयास्पद मृत्यूfile photo
Published on
Updated on

गडचिरोली : बदलापूर येथील घटनेने राज्यात संताप व्यक्त होत असताना आज (दि. २४) सकाळी कुरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका युवतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम (वय २६) असे मृत युवतीचे नाव आहे.

आज सकाळी येथील जिल्हा परिषद आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या युवकांना भिंतीला लागून युवतीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळावर बघ्यांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले व ठाणेदार महेंद्र वाघ यांनी ताफ्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी पंचनामा केल्यानंतर युवतीचा मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. युवतीच्या शरीरावर मार लागल्याच्या कुठल्याही खुणा नाहीत. शिवाय गळाही आवळलेला नाही. त्यामुळे प्राथमिक तपासात युवतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट नाही. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मृत युवतीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री १० वाजताच्या सुमारास ज्योती घराबाहेर गेली होती. ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला. परंतु ती सापडली नाही. आज सकाळी तिच्या मृत्यूची बातमी कळताच मृत युवतीच्या आईने एकच हंबरडा फोडला. काही दिवसांपूर्वी एका दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या आईवर या घटनेने मोठे संकट कोसळले आहे.

Gadchiroli girl suspicious death
बदलापूरच्या अल्पवयीन मुलींवर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news