

गडचिरोली : 'आदी कर्मयोगी' अभियानांतर्गत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे आयोजित समारंभात पंडा यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.
३८ टक्के अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर एवढा आहे. शिवाय ७० टक्यांहून अधिक जास्त वनक्षेत्र आणि विरळ लोकवस्तीमुळे येथे सेवा पोहोचवणे मोठे आव्हान आहे. असे असतानाही आदी कर्मयोगी अभियानाद्वारे तळागाळातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यात आली. जिल्ह्यात ५५३ आदी सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली. ५३ हजार नागरिकांचे एकत्रीकरण तसेच ५५३ ग्रामसभांचे आयोजन करुन प्रत्येक गावाचा ग्राम कृती आराखडा तयार करण्यात आला. याद्वारे शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात आला.
सामुदायिक वनहक्क कायद्यान्वये ग्रामसभांना ५ लाख १२ हजार हेक्टरहून अधिक वनजमीन व्यवस्थापनासाठी सुपूर्द करण्यात आली. ४९७ ग्रामसभांची मनरेगा अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने १७ विविध विभागांशी प्रभावी समन्वय साधला. या लोककल्याणकारी व परिणामकारक प्रशासकीय मॉडेलमुळे गडचिरोली जिल्हृयाला पुरस्कृत करण्यात आले. राज्यातून केवळ गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या मॉडेलचे प्रभावी सादरीकरण केले. त्यामुळे पंडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.