चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
भारतीय हवामान खात्याने काल (सोमवार) दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भातील सर्व जिह्यात 26 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. काल सोमवार पासून चंद्रपूरसह विदर्भात सर्वदूर पाऊस सुरू आहे. हलक्या व मध्यम जातींच्या धानपिकांना फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. एकीकडी पाऊस सुरू असतानाही उष्णतेमध्ये वाढ होत असल्याने नागरिक उकाड्यापासून बैचेन होत आहेत.
या वर्षी उशिरा सुरू झालेला पाऊस चांगलाच लांबत आहे. आठवडा, पंधरवाड्याच्या फरकाने पावसाचे कोसळने सुरूच आहे. पंधवाड्यापासून विसावलेला पाऊस काल सोमवार पासून पुन्हा विदर्भात सक्रिय झाला आहे. काल पासून चंद्रपूरसस विदर्भातील सर्व जिल्ह्यात कमी अधीक प्रमाणात पाऊस कोसळत आहे.
सोमवारी भारतीय हवामान खात्याने 26 सप्टेंबर पर्यंत येलो अलर्टचा इशारा दिला आहे. सोमवार ते गुरूवार पर्यंत चार दिवस विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आदी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाउस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 27 सप्टेंबरला भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया व नागपूर वगळता उर्वरित जिल्ह्यत येलो अलर्टचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर काल सोमवार पासून चंद्रपूरसह विदर्भात पाऊस सुरू झाला आहे. सोमवारी दिवसा व रात्री पाऊस कोसळला. तर आज मंगळवारी सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. 26 सप्टेंबर पर्यंत पाऊस कोसळला तर खरीब हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. सिंचन सुविधा नसलेल्या ठिकाणी हलक्या आणि मध्यम कालावधींच्या पिकांची लागवड केली जाते. सध्या हलक्या जातींचे धानपिक काही ठिकाणी कापनीला आले आहे. तर येत्या पंधरवाड्यात मध्यम कालावधीचे पिके कापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऐन धानपिक बहरले असतानाच काल पासून सुरू झालेल्या पावसामुळे पिकांची शेतकऱ्यांच्या तोंडचे घास हिरावले तर जाणार नाही ना अशी भिती व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूरजिल्ह्यात कोरपना, वरोरा, राजूरा,जिवती बल्लारपूर, तसेच भद्रावती तालुक्याचा काही भागात सोयाबनची लावगड करण्यात आली आहे. नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पीक दिवाळी पर्यंत निघते, परंतु सततच्या पावसामुळे सोयाबीनलाही फटका बसण्याची शक्यता आहे. थोड्याफार प्रमाणात लागवड होत असलेल्या कापूस पिकाची स्थिती वेगळी नाही. कालपासून सुरू झालेला पाऊस आज मंगळवारी दुसऱ्यादिवशीही दूपारपर्यंत सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.