चंद्रपूर : जीवन संपवण्यासाठी पत्नीने विहिरीत उडी घेतली. पत्नीला वाचविण्यासाठी पतीने धाव घेत विहिरीत उडी घेऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघाही पती-पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (दि.24 ऑगस्ट) च्या रात्री साडेनऊच्या सुमारास पानोरा (ता. गोंडपिंपरी) येथे घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकाश शरबत ठेंगणे, उषा प्रकाश ठेंगणे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील छोट्याशा पानोरा गावात तीन महिन्यांपूर्वी प्रकाश ठेंगणे व उषा ठेंगणे यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. तेव्हापासून त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. शनिवारच्या (दि.24) रात्री साडेनऊच्या सुमारास घरी असताना अचानक पत्नी उषा ठेंगणे गावातील विहिरीत जीवन संपवण्यासाठी गेली. त्याचवेळी तिला वाचवण्यासाठी पती प्रकाश ठेंगणे धावून गेला. पत्नीने विहिरीत उडी घेतल्याने बघताच पतीनेही तिला वाचविण्यासाठी विहीरीत उडी घेतली.
परंतु,पती पत्नीला वाचवू शकला नाही. काही वेळातच दोघांचाही विहीरीत बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात समजताच नागरिकांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. विहिरीतील दोन्ही मृतदेह रात्रीच पोलिसांनी बाहेर काढले. गोंडपिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.