चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने काल (शुक्रवार) 'आक्रोश मोर्चा ' काढण्यात आला. मोर्चाच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्याचा सामूहिक निर्णय 2 दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. यात अनेक हिंदू संघटनांना पाचारण करण्यात आले. काल (शुक्रवार) सकाळी 10.30 वाजता शिवाजी चौक येथे सकल हिंदू समाजाचे एकत्रीकरण झाल्यावर आक्रोश मोर्चा गांधी चौक-जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तब्बल 3 तास चाललेल्या या मोर्चात बांगलादेश व पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करीत मोर्चेकरूंनी आक्रोश केला. या विशाल आक्रोश मोर्चाचे नेतृत्व सकल हिंदू समाजाचे संयोजक शैलेश बागला, रोडमल गहलोत, रामकिशोर सारडा, मिलिंद कोतपल्लीवार, गुणवंत चंदनखेडे, दामोदर मंत्री, अजय जयस्वाल, रणजीतसिंग सलुजा, ग्यानचंद टहलियानी, यशवंत कलमवार, मधुसुदन रुंगठा, अशोक हासानी रीतेश वर्मा, प्रा.जुगलकिशोर सोमानी, विनोद कुमार तिवारी, डॉ.शैलेंद्र शुक्ला व पंकज शर्मा यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली. बांगलादेशाचा यावेळी सर्वांनी निषेध नोंदविला. हिंदूधर्मरक्षणासाठी निघलेल्या या आक्रोश मोर्चात मातृशक्ती व तरुणाईने मोठया संख्येने सहभाग नोंदविला. तरुणाईने भगवा ध्वज तर मातृशक्तीने निषेधाचे फलक हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाने जनतेला आवाहन केले होते. याची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी मोर्चात शेवटपर्यंत सहभाग नोंदविला. यावेळी पत्रकारांशी बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, बांगलादेशातील जनता सत्तेविरुद्ध पेटून उठल्याने पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात शरण घ्यावी लागली. असे असतांना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आहेत. हिंदूंची घरे जाळली जात असून, त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे. मानवतेला काळिमा फसण्याचा हा प्रकार आहे. हिंदूंवरीलच नाही तर कोणत्याही समाजावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत असे मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितले.