चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
पानठेल्यावर खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी एका (१६ वर्षीय) अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार शहरालगतच्या परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी बबन रोहणकर (वय ५२) याच्यावर, पोक्सो, ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नागभिड तालुक्याच्या ठिकाणी एका गतिमंद महिलेवर अत्याचाराची घटना घडली असताना पुन्हा एकदा ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
चंद्रपूर शहराला लागून असलेल्या एका गावात संशयित आरोपी बबन रोहणकर याचा पानाचा ठेला आहे. त्याच्या पानठेल्यावर एक अल्पवयीन (१६ वर्षीय) मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खर्ऱ्याची उधारी तीन हजारांवर पोहोचली होती. संशयित आरोपीने त्या मुलीला खर्ऱ्याची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर वडिलांना सांगण्याची धमकीही दिली. मात्र त्या मुलीकडे खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी पैसे नव्हते. हीच संधी साधून संशयिताने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून मागील तीन ते चार महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण केले. यामध्ये ती गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करून संशयित आरोपी बबन रोहनकरला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.
पीडित मुलीच्या हालचालीवरून तिच्या आईला संशय आला. तिची तपासणी करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले. यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी कार्यवाही करून संशयित आरोपीला अटक केली आहे.