

चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी शहरातील सराईत गुन्हेगार आनंद उर्फ गुड्डू रविंद्र गेडाम (वय 23) रा. डॉ. आंबेडकर कॉलेज जवळ, मित्रनगर, चंद्रपूर यास १ वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याची मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीस जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करून पुढील कार्यवाहीसाठी सोलापूर कारागृहात हलविण्यात येणार आहे.
सन 2020 ते 2025 या पाच वर्षांच्या कालावधीत आरोपी गुड्डू गेडाम याच्याविरुद्ध रामनगर व इतर पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 15 ते 20 गुन्ह्यांची नोंद आहे. यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न, दंगा, गंभीर दुखापत, धमकी, अवैध शस्त्र बाळगणे, आग लावणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे समाविष्ट आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती, एवढेच नव्हे तर सामान्य नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासही घाबरत होते.
आरोपीविरुद्ध पूर्वी कलम 110(ई), (ग) जाफौ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्या कालावधीतही त्याने गुन्हे सुरू ठेवल्याने त्याचे बाँड रद्द करण्यात आले. त्यानंतर पोलीस विभागाने त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला.
रामनगर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध “महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, 1981 (सुधारणा 2009, 2015)” अंतर्गत प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मंजुरीनंतर गुड्डू गेडाम यास १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी प्रदीप चौगुले, आणि पोलीस निरीक्षक आसीफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश खरसान (प्रभारी पोस्टे कोठारी), पोउनि सुरेंद्र उपरे, तसेच पोलीस हवालदार संजु देशवाले, अरुण खारकर, परवेज शेख, अनिल जमकातन, राजु चिताडे, मनीषा मोरे, ब्ल्युटी साखरे आणि रामनगर गुन्हे अन्वेषण पथकातील अधिकारी व अमलदार यांचा सहभागाने पार पडली.
रामनगर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती दिसल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. गुन्हेगारीवर कठोर कारवाई सुरू असून, शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्धार असल्याचे सांगण्यात आले.