चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानकावरील प्रसाधनगृहात एका गतिमंद महिलेवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या पाचही संशयीत आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल शनिवारी पाचही संशयित आरोपींना दिवाणी व फौजदारी न्यायालयात करण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास नागभीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गतिमंद महिलेवर अत्याचार केल्याचा आक्षेपार्य व्हिडिओ सोशल मीडियावर (व्हाट्स ॲप) वर व्हायरल करण्यात आला होता. नागभीड पोलिसांनी व्हिडिओतील या घटनेची दखल घेत तातडीने कार्यवाही केली. सर्वप्रथम व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर अत्याचार करणारा आणि व्हिडिओ घेणाऱ्या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर एकूण पाच संशयितांना अटक करण्यात आली.
या लोकांनी 12 ऑगस्टच्या मध्यरात्री एका गतिमंद महिलेला नागभीड बस स्थानकावरील प्रसाधनगृहात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि एकाने त्या प्रसंगाचा व्हिडिओ तयार केला होता. सदर संशयिताने तो व्हिडिओ त्याच्या एका मित्राला पाठविला आणि मित्राकडून तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर ही घटना लक्षात आली. तसेच सदर महिलेवर अत्याचार करण्याकरता अन्य लोकांनी अत्याचारास मदत केल्याच्या संशयावरून या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांमध्ये मोईन उमर शेख (वय 19), हरिनारायण मांढरे (वय 39), मयूर वंजारी (वय 18), कार्तिक बनकर वय 28), आणि कुणाल पाठक (वय19) आदींचा समावेश आहे.
चारजण नागभीड तर एक संशयीत पवनी येथील आहेत. शुक्रवारी पाचही जणांना नागभीड पोलिसांनी अटक केली. काल शनिवारी या सर्वांना दिवाणी व फौजदारी न्यायालय हजर केले. पाचही संशयीत आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या संतापजनक घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.