चंद्रपूर : शहरातील बिनबागेट परिसरातील शाही दरबार हॉटेलमध्ये सोमवारी (दि.१२) सायंकाळी चारच्या सुमारास हाजी सरवर शेख या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सहा संशयित आरोपींना आज (दि.१३) पोलिसांनी अटक केली. समीर शेख, श्रीकांत कदम (दिग्रस), निलेश अलियास उर्फ पिंटू (नागपूर), प्रशांत मलवेणी, राजेश मूलकलवार (नकोडा) अशी पाच संशयित आरोपींची नावे असून सहाव्या आरोपीला नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. या संशयित आरोपीचे नाव समजू शकले नाही. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडून ४ बंदुकांसह चाकू हस्तगत केला.
घुग्घुस शहरातील कोळसा तस्करीपासून गुन्हेगारी विश्वात उतरलेला कुख्यात गुंड हाजी सरवर याच्यावर हत्या, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली असून त्याची परिसरात प्रचंड दहशत होती. सोमवारी घटनेच्या दिवशी मुख्य आरोपी समीर शेख यांच्या सहकाऱ्यांनी हाजी शेख याची रेकी केली. त्यानंतर समीर शेख याने पाच सहकाऱ्यांच्या मदतीने शाही दरबार हॉटेलमध्ये जाऊन शेख यांची गोळ्या झाडून हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुग्घूस येथील हाजी शेख हा सोमवारी आपल्या मित्रांसह चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरातील शाही दरबार हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. त्याच्यावर पाळत ठेवून काहीजणांनी हॉटेलमध्ये घुसून हाजी शेख याच्यावर गोळीबार केला. शेख याला दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार चाकूने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हाजी शेख याच्यासोबत आलेल्या दोन सहकाऱ्याच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. घटनेनंतर आरोपी हॉटेलमधून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. व शहरात नाकेबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला. यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेसमोर पाच संशयित आरोपींनी मंगळवारी आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर आणखी एका आरोपीला नागपुरातून अटक करण्यात आली. हाजी शेख हत्येसाठी वापरण्यात आलेल्या चार बंदूका व चाकू हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात समीर शेख हा मुख्य आरोपी असून अन्य पाच आरोपींच्या मदतीने त्याने अवैद्य धंद्यातील वर्चस्वाच्या वादातून हाजी शेख याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.