'मधाचे गाव’ म्हणून मामला गावाचा महाराष्ट्रात लौकीक वाढेल : सुधीर मुनगंटीवार

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
As a 'honey village', Mamala village will grow in popularity in Maharashtra: Sudhir Mungantiwar
'मधाचे गाव’ म्हणून मामला गावाचा महाराष्ट्रात लौकीक वाढेल : सुधीर मुनगंटीवारFile Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

‘मधाचे गाव’ म्हणून मामला गाव नावारुपास आले आहे. येथील मधाच्या निर्मितीतून गावातील महिला बचत गट प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करतील. त्यामुळेच बचत गट दत्तक घेण्याची योजना आखली असून 30 बचत गटांना मधपेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मामला गावाचा केवळ विदर्भात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ‘मधाचे गाव’ म्हणून लौकीक वाढेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

मामला येथे निसर्ग शिक्षण संकुलासह विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, बी.आर.टी.सी.चे संचालक अशोक खडसे, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, प्रकाश धारणे, रामपाल सिंग, बंडू गौरकार आदी उपस्थित होते.

मामला येथे वनविभाग व इको टुरिझमच्या माध्यमातून निसर्ग पर्यटक संकुल उभारण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘भविष्यात यातून स्थानिकांना मोठा रोजगार प्राप्त होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या गावात येतील. तेव्हा खऱ्या अर्थाने उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण होईल. मामला गावाच्या विकासासाठी सिमेंट रस्ता, मूल मुख्य रस्त्यापासून येणारा डांबरी रस्ता, तलावाची डागडुजी, विद्युत व्यवस्थेचा विषय तसेच पायाभूत सुविधांची कामे आपण पुर्णत्वास नेली.

‘शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करता यावे, यासाठी वन विभागाच्या माध्यमातून झटका मशीनचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात 6 हजारांपेक्षा जास्त झटका मशीन वितरित करण्यात आल्या आहेत. भविष्यात 25 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात साडेसात हॉर्सपॉवरपर्यंत विजेचे पंप आहेत, अशा शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 65 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तींसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तर युवकांसाठी माझा लाडका भाऊ योजना सुरु केली,’ याचाही मुनगंटीवार यांनी उल्लेख केला.

मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर म्हणाले, 2016 पूर्वी आगरझरी तर 2019 मध्ये मदनापूर येथे निसर्ग पर्यटन संकुलाची निर्मिती करण्यात आली. नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना निसर्ग पर्यटन संकुलाचा लाभ मिळावा, यासाठी मामला येथे निसर्ग पर्यटन संकुल उभे राहत आहे. मामला येथील तलावामध्ये नौकाविहार हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. गावातील तरुणांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस्, गोवा येथे प्रशिक्षण देण्यात आले. नौकाविहार ॲक्टिव्हिटी रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचेही ते म्हणाले. मुलांचा वने व वन्यजीव संवर्धनामध्ये सहभाग वाढावा यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात ‘चला माझ्या ताडोबाला’ हा उपक्रम 2015-16 मध्ये सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाखाच्यावर विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.

वनविभागातर्फे मामला गावातील किशोर मंडलवार, रामदास रामटेके, बापूजी तोडाम, महेंद्र खोब्रागडे, अशोक आलाम या शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सोलर कुंपणाचे वाटप करण्यात आले. मधाचा व्यवसाय करण्यासाठी रजनी पुरी, दत्तू येरगुडे तसेच सुनिता इटकेलवार आदी बचत गटातील महिलांना मधपेटीचे वाटप करण्यात आले. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स पणजी (गोवा) येथे रघु बोरुले, रिकेश मल्लेलवार, अर्जुन धुर्वे, भूषण रामटेके, नितेश कुन्नावार, शंकर येडावार या सहा तरुणांना नौका विहाराचे प्रशिक्षण देण्यात आले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news