भंडारा : पुढारी वृत्तसेवा : बँकेतून काढलेली रक्कम दोन अज्ञात महिलांनी पळवून नेल्याची घटना भंडारा शहरात घडली. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहिली घटना भंडारा पोलिस ठाण्याच्या समोरील बँक ऑफ महाराष्ट्र येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कविता बळगे ( वय ४७, रा. गराडा) ही महिला बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आली. त्यांनी बँकेतून एक लाख रुपये काढले. पैसे मोजत असताना दोन महिला तोंडावर रुमाल बांधून कविता बळगे यांच्याजवळ आल्या. तेवढ्यात त्या महिलांनी कळगे यांच्या पिशवीतील एक लाख रुपये लंपास करुन पळून गेल्या. काही वेळानंतर कविता बळगे यांनी पिशवी तपासली असता पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी बँक व्यवस्थापकाला ही माहिती दिली. व्यवस्थापकांनी तात्काळ बँकेचे गेट बंद करुन बँकेत असलेल्या लोकांची तपासणी केली. परंतु, काहीही उपयोग झाला नाही.
दुसऱ्या घटनेत, पौर्णिमा मदने (रा. गराडा खुर्द) यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ९० हजार रुपये काढले. पैसे मोजून बॅगमध्ये ठेवले. त्यानंतर ऑटोने गांधी चौकातून निघाल्या. तेवढ्यात त्यांच्या बाजुला दोन महिला येऊन बसल्या. त्यावेळी ऑटोमधील एक महिला आपली बॅग पौर्णिमा मदने यांच्या बॅगजवळ आणत होती. तेव्हा पौर्णिमा मदने यांनी तिला हटकले होते. त्यानंतर पौर्णिमा मदने पोस्ट ऑफीस चौकात उतरल्या. तेव्हा बॅगची पाहणी केली असता ४० हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या धावत बसस्टॉपकडे आल्या. परंतु, तोपर्यंत त्या अनोळखी महिला पळून गेल्या होत्या. दोन्ही घटनांची नोंद भंडारा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितनवरे करीत आहेत.