

Sakoli Malutola Mother son death electric wires
भंडारा: साकोली तालुक्यातील मालूटोला येथे रविवारी दुपारी विजेच्या तारांच्या स्पर्शाने शेतात काम करीत असलेल्या मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत एका वासराचाही मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महानंदा प्रभुदास इलमकर (वय ५०) व त्यांचा मुलगा सुशील प्रभुदास इलमकर (वय ३०) हे दोघे शेतात असताना विजेच्या प्रवाहाने जागीच मृत्यूमुखी पडले. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी सोलरवर आधारित विद्युत प्रवाह असलेली तार शेतशिवाराभोवती लावलेली होती. मात्र, अचानक आलेल्या वादळी वाºयामुळे मुख्य विद्युतवाहक तार तुटून या सोलर तारेवर पडली. त्यामुळे सोलर तारेत उच्चदाबाचा करंट प्रवाहित झाला.
माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास वाºयाच्या दबावामुळे लाकडावर टांगलेली वीजवाहक तार तुटून खाली पडली. त्याचवेळी शेतात गाईचा वासरू गेला असता तीव्र करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. वासराला काय झाले हे पाहण्यासाठी महानंदा इलमकर शेतात गेल्या, पण त्यांनाही करंट बसला आणि त्यांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. आईचा आवाज ऐकून धाव घेतलेल्या सुशील इलमकर यालाही तीच तार लागल्याने काही क्षणात त्याचाही मृत्यू झाला.
दुपारपासून शेतात गेलेले मायलेक घरी परतले नाहीत, हे लक्षात आल्याने प्रभुदास इलमकर हे सायंकाळी पाचच्या सुमारास शेतात गेले. त्यांना समोरील दृष्य पाहून धक्का बसला. घटनास्थळी मायलेक आणि वासरू मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ गावात येऊन ही माहिती दिली. गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. उपजिल्हा रुग्णालय, साकोली येथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहांवर मालुटोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.