साकोली शहरातील मुख्य न्यायालय चौकातच एका युवकाने झाडाला गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना शनिवारी (दि.21) घडली. यानंतर स्थानिक लोकांनी आरडो-ओरड केली. यावेळी तातडीने साकोली पोलीस घटनास्थळी धावून आले. उमेश्वर सुर्यभान वाघाडे (वय.३८) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती होताच साकोली पोलीस ठाणे निरीक्षक संजय गायकवाड यांच्या सुचनेने पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले हे घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. सदर मृतक इसम हे साकोली काही कामानिमित्त आले होते असा अंदाज आहे.
मृतकाने घटनास्थळी झाडाखाली एक कापडी पिशवी आणि चप्पल काढून ठेवली होती. ही घटना कळताच बाजूलाच न्यायालयातील वकील मंडळींनी येथे धाव घेतली. या घटनेचे कारण अद्यापही कळू शकले नाही. पण अचानक मुख्य आणि रहदारी चौकातच सर्वांच्या समोर एक इसमाने फाशी लावल्याची ही साकोली शहरातील पहिलीच घटना आहे. याविषयी पोलीसांना अधिक माहिती देतावेळी सामाजिक कार्यकर्ता अविनाश ब्राह्मणकर, विजया ठाकरे, विनायक देशमुख, ॲड. बालगोविंद गुप्ता, ॲड. अनिल पटले आदी घटनास्थळी होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले करीत आहेत.