अमरावती : शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या विरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा आज (दि.६) दिला.
सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्राविषयी दिलेल्या निकालावर असमाधान व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे आनंदराव अडसूळ मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय अंतिम असल्याचे सांगत नवनीत राणा यांच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र या निकालाचा देशावर काय परिणाम होणार, याचा विचार करण्यात आलेला नाही. जात पडताळणी समितीला हाताशी धरून कुणीही बनावट कागदपत्रांच्या आधारे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेईल. या निर्णयामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना दाद मागता येणार नाही. त्यामुळे नवनीत राणा यांच्या जात पडताळणी प्रकरणाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करू, असा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अमरावती लोकसभा निवडणुकीतून आपण माघार घेतली होती. मात्र आश्वासनाचे पुढे काहीच झाले नाही. एखाद्या गोष्टीची मर्यादा असते. त्यामुळे आणखी पंधरा दिवस आपण वाट पाहणार आहोत. त्यानंतर नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असे अडसूळ यांनी स्पष्ट केले.