अमरावती :
कोलकाता आणि बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण चर्चेत असताना अमरावतीतही एका शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीला बॅड टच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका शाळेतील शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या शरीराला आक्षेपार्ह स्पर्श करून तिचा विनयभंग केला. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रियाजुद्दीन शेख शफीक उद्दीन शेख (वय ५०) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाकडे शारीरिक शिक्षणाची (पीटी) जबाबदारी शाळेमध्ये आहे. दरम्यान, दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी संबंधित शाळेत एक विद्यार्थिनी चक्कर येऊन खाली पडली होती. त्यावेळी खाली पडलेल्या मुलीच्या अवतीभवती शाळेतील सर्व मुले- मुली गोळा झाल्या होत्या. पीडित विद्यार्थिनी ही यावेळी तेथेच मागे उभे होती.
यावेळी आरोपी शिक्षकाने भोवळ येऊन खाली पडलेल्या मुलीला श्वास घेता यावा, म्हणून सर्व मुला-मुलींना बाजूला केले. या दरम्यानच पीडित विद्यार्थिनीच्या शरीराला शिक्षकाने बॅड टच केला. त्या मुलीने शिक्षकाचा हात झटकला आणि ती तिथून निघून गेली. यापूर्वी सुद्धा आरोपी शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला आपण बाहेर फिरून येऊ असे म्हटले होते.
शिक्षकाच्या या प्रकाराला त्रासून अखेर त्या मुलीने सगळी हकीकत घरी तिच्या आईला सांगितली. हा धक्कादायक प्रकार माहिती पडताच मुलीची आई लगेच त्या शाळेत पोहोचली. तिच्या आईने हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकाला सांगितला आणि त्यानंतर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान, कोलकाता आणि बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांचे पथक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना बॅड टच, लैंगिक अत्याचार, छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. दरम्यान पोलिसांचे एक पथक २१ ऑगस्ट रोजी संबंधित शाळेतही जनजागृतीसाठी पोहोचले होते. त्या ठिकाणी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले होते. अशा प्रकारच्या घटना शाळा महाविद्यालयात निदर्शनास आल्यास मुख्याध्यापक व प्राचार्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती देणे बंधनकारक आहे. तशा सूचना पोलिसांच्या वतीने सर्व शाळा व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहे.