अमरावती : शाळेच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून एका बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये नेण्यात आले.तेथील एका खोलीत तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. ही संतापजनक घटना दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत २४ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. रोशन अरुण पळसपगार (वय २५) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर उभी होती. त्यावेळी आरोपी रोशन हा तेथे दुचाकीने आला. त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसविले. आणि आपण फिरून येऊ असे म्हटले. त्यानंतर तो तिला एका बार अॅण्ड रेस्टॉरंटवर घेऊन गेला. तेथील खोलीत त्याने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या घटनेनंतर पीडित मुलगी ही घरी गेल्यावर तिने आईजवळ सर्व हकीकत सांगितली. हा धक्कादायक प्रकार कळताच तिच्या आईने पीडित मुलीला सोबत घेऊन दर्यापूर ठाणे गाठले. पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास दर्यापूर पोलीस करत आहेत.