

अकोला : जिल्ह्यातील कापूस पिकाची स्थिती शेतकऱ्यांना विवंचनेत टाकणारी ठरत आहे. कपाशी पिकांवरील संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट आल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील काही भागातील शेतीक्षेत्रातील कपाशीवर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे .त्यामुळे कापूस उत्पादन घटनार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
या खरीप हंगामात जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीवर प्रारंभीपासून विविध किड व रोगाचे आक्रमण दिसून आले आहे. त्यावर उपाय योजना करीत शेतकऱ्यांनी मशागत खर्च केला आहे. मात्र या पिकाच्या वाढीकरिता दिवसेंदिवस मशागत खर्च वाढता आहे. अनेक संकटावर मात केल्यानंतर अतिवृष्टी आणि सतत पावसाचे सत्र या मुळे कपाशीवरील अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून आले. अशातच पावसाचे सत्र थांबल्यानंतर आता कपाशीवर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीने आक्रमण केले आहे .त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसत आहे. कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांची पाहणी
सद्यस्थितीत कपाशी पिकावर काही ठिकाणी तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अकोट तालुक्यातील काही गावांमध्ये डॉ .पं .दे .कृषी विद्यापिठ कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या चमूने प्रक्षेत्र भेट दिली. दिनोडा, रोहनखेड, भांबुर्डा, अंतरगाव, वरूड-जऊळका, इसापूर या गावांमध्ये कपाशी वर या अळी चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याबाबत शेतकऱ्यांना उचित मार्गदर्शन करण्यात येत आहे.
दिवाळीतही कापसाचा पहिला वेचा नाही
या वर्षी कापूस पिकावर बदलत्या वातावरणाचा वेळोवेळी परिणाम झाला आहे. त्यामुळे दिवाळी च्या दरम्यान कापाशी च्या शेतात होणारी सितादही ची पूजा आणि कापसाचा पहिला वेचा अनेक भागातील शेतकऱ्यांच्या घरी आला नाही. जुन्याच कापसाच्या वाती दिवाळीला दिव्यामध्ये पेटविण्यात येतील अशी खंत काही भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.