

अकोला, पुढारी वृत्तसेवा: शहरातील हरिहर पेठ भागात सोमवारी सायंकाळी दोन गटात वाद उफाळून आला होता. दगडफेकीनंतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांची धरपकड रात्रीपासून सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, या भागात आज (दि.८) सकाळपासून शांतता दिसत आहे. पोलिसांचा ताफा या परिसरात तैनात केला आहे.
सोमवारी सायंकाळी हरिहर पेठ परिसरात ऑटो व दुचाकी धडक लागल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला होता, अशी माहिती आहे. त्यानंतर दोन गटांत दगडफेक व वाहनांची जाळपोळ झाली. या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांचा मोठा ताफा या भागात दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. यानंतर आ. रणधीर सावरकर यांनी नागरिकांना शांतता ठेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, कालच्या घटनेनंतर आज सकाळपासून या भागात शांतता आहे. ठीक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शहरातील इतर संवेदनशील भागावर पोलीस करडी नजर ठेऊन आहेत. अशा भागात पोलिसांची गस्त सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.