

अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे अकोला जिल्ह्यातील कापसाचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणारी भारतीय कापूस महामंडळाची (CCI) खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सीसीआयने यंदा १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र आजपर्यंत जिल्ह्यात एकही खरेदी केंद्र कार्यान्वित झालेले नाही. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना पहिल्याच वेचणीतील कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या कमी दरात विकावा लागत आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी अडचणीत
सततच्या पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे कापूस हंगाम लांबणीवर पडला आहे. यंदा दिवाळीच्या दिवशीही नवीन कापूस बाजारात म्हणावा तसा दिसला नाही. कीड आणि रोगांमुळे कपाशीच्या बोंडांची गळती झाली, तसेच 'लाल्या' रोगाचा प्रादुर्भावही वाढला.
उत्पादन खर्च वाढला: बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, रासायनिक खते आणि मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने कपाशीच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे.
दरात घसरण: शासनाने कापसावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे दरास मोठा फटका बसला आहे. काही भागांत पावसामुळे पहिल्या वेचणीचा कापूस भिजल्याने त्याची प्रतवारी खराब झाली आहे.
हमीभावापेक्षा कमी दरात विक्रीची वेळ
चालू हंगामासाठी केंद्र सरकारने कापसाला 7 हजार 710 रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजारात खासगी व्यापारी यापेक्षा खूपच कमी, म्हणजेच 6 हजार ते 6 हजार 3०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करत आहेत.
उत्पादन खर्च वाढलेला असताना, त्या तुलनेत भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. सीसीआयची खरेदी सुरू न झाल्यामुळे नाइलाजाने कमी दरात कापूस विकून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.