आ. राजू कारेमोरे यांना अटक, पोलिस ठाण्यात गोंधळ घालणे पडले महागात - पुढारी

आ. राजू कारेमोरे यांना अटक, पोलिस ठाण्यात गोंधळ घालणे पडले महागात

भंडारा : पुढारी वृत्तसेवा 

तुमसर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांना मोहाडी पोलिस ठाण्यात अश्लिल शिवीगाळ करुन गोंधळ घालणे चांगलेच महागात पडले आहे. आ. राजू कारेमोरे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन भंडारा येथे त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना मोहाडी न्यायालयात हजर करण्यात आले. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

३१ डिसेंबर रोजीच्या रात्री तुमसर येथील व्यापारी भंडाराकडून तुमसरकडे कारने जात असताना मोहाडी शहराबाहेर असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयासमोर असलेल्या पोलिसांनी व्यापाऱ्याला मारहाण करून कारमध्ये ठेवलेले ५० लक्ष रुपये लुटल्याचा आरोप करण्यात आला होता.

यात दोन व्यापाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याने मोहाडीच्या पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तेवढ्यात या व्यापाऱ्यांनी आ. राजू कारेमोरे यांना पोलिस ठाण्यात बोलाविले. आ. कारेमोरे यांनी पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करीत गोंधळ घातला होता. महिलासुद्धा ऐकू शकणार नाही, अशी शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड वायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी दोन्ही व्यापाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर आज आ. राजू कारेमोरे यांच्यावरही विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. त्यानंतर त्यांना भंडारा येथे अटक करुन मोहाडी येथे न्यायालयात नेण्यात आले. दरम्यान, अश्लिल शिवीगाळ प्रकरणी आ. कारेमोरे यांनी पत्रपरिषद घेवून जाहीर माफीसुद्धा मागितली होती.

गृह विभाग असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारावर गुन्हे नोंदवून अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Back to top button