dilip walse-patil : फडणवीसांच्या आक्षेपानंतर गृहमंत्र्यांची सावध भूमिका | पुढारी

dilip walse-patil : फडणवीसांच्या आक्षेपानंतर गृहमंत्र्यांची सावध भूमिका

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : नितेश राणेंचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच नोटीस बजावून कणकवली पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी पाचारण केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर नागपुरात माध्यमांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse-patil) यांनी यावर सावध भूमिका घेतली.

नारायण राणे यांना पोलिस ठाण्यात बोलवायचे की त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवायचा यावर चर्चा सुरू असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.

dilip walse-patil : नारायण राणेंना पोलिस स्थानकात बोलावणे गुन्हा

सीआरपीसी १६० ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे, असा आक्षेप फडणवीस यांनी घेतला होता.

त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ ए अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नेमके काय करायचे यावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस कायद्याने त्यांना अनुमती असेल तेच करू शकतात. इतर काही ते करू शकत नाहीत. पोलिसांनी त्याच अनुषंगाने राणेंना नोटीस बजावली असावी, अशी सारवासारव त्यांनी केली.

कालिचरण महाराजांना ताब्यात घेणार

कालीचरण महाराजांना ताब्यात महाराष्ट्र पोलिस नक्कीच घेईल. राष्ट्रपीत्याचा संदर्भात असे शब्द वापरणे, त्यांचा अपमान करणे खूप मोठा गुन्हा आहे. खरे पाहिले तर त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात जिथे जिथे गुन्हे दाखल झाले आहे. त्या त्या ठिकाणी पोलिस त्यांना ताब्यात घेतील, असे ते म्हणाले.

Back to top button