चंद्रपूर : प्रतिनिधी
वेळवा गावालगतच्या पुलाजवळ बसून असलेल्या एका मनोरुग्ण महिलेवर वाघाने हल्ला केला. यामध्ये महिला ठार झाली. ही घटना (गुरुवार) सकाळच्या सुमारास घडली. संध्या बावणे असे मृत महिलेचे नाव आहे. ती वेळवा येथील रहीवासी आहे.
मागील काही महिन्यांपासून पोंभुर्णा तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत. मागील काही दिवसांपासून वेळा येथील महिला मनोरूग्ण असल्याने ती इतरत्र फिरत होती. कुठेही जाणे, कुठेही बसणे तिची नित्याची बाब झाली होती. मात्र गुरूवारी संध्या बावने ही महिला पोंभूर्णा पासून तीन किमी अंतरावरील वेळवा गावालगतच्या पुलाजवळ एकटीच बसून होती.
दरम्यान या परिसरातील जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करुन तिला ठार केले.
वाघ एवढ्यावरच थांबला नाही. त्याने सदर महिलेच्या शरीराचा बराच भाग खाल्याचे समजते. सदर घटना घडताच वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळी येऊन मृतदेहाची शोधाशोध केली. काही अंतरावर पडून असलेल्या मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.
काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला ही मनोरूग्ण असल्याने ती परिसरात फिरत होती. गुरूवारची सकाळ तिच्या जिवनाची शेवटची सकाळ ठरली. तिच्या पश्चात दोन मुले असल्याची माहिती आहे. काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला ठार करणारा हा पट्टेदार वाघ असावा, तर काहींच्या मते बिबट्या असल्याची चर्चा आहे. या घटनेने वेळवा परिसरात प्रचंड दहशत आहे. या दु:खदायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी याच मार्गाने जाणा-या दुचाकीस्वारांवर वाघाने हल्ला केला होता.
मागील महिन्याभरापासून पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत सूरू आहे. महिनाभरात वाघाने चार बळी घेतले आहेत. दरम्यानच्या काळात वनविभागाने गस्त वाढविली. वाघाचा हालचालीवर नजर ठेवली होती. मात्र आज पुन्हा वाघाने हल्ला करीत महीलेचा बळी घेतला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने तालुक्यात दहशत पसरली आहे.
बावणे यांच्या कुटूंबियांची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सांत्वनापर भेट
पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा येथे संध्या विलास बावणे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाला. या घटनेनंतर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मृतक संध्या बावणे यांच्या कुटूंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी मृतकाच्या कुटुंबीयांना आ. मुनगंटीवार यांनी आर्थिक मदत केली.
आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक एन. प्रविण यांना घटना स्थळावरुन दुरध्वनीद्वारे संपर्क साधत मृतकाच्या कुटूंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. त्याच प्रमाणे मृतकाच्या कुटुंबातील मुलगा आणि मुलीला त्वरित रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सुध्दा त्यांनी दिल्या. या परिसरातील वाघाचा धुमाकुळ थांबविण्याच्या दृष्टीने त्वरित पिंजरे बसवावेत व वाघाला जेरबंद करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्या अशा सूचना देखिल आ. मुनगंटीवार यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिल्या.