Gang Rape Nagpur : नागपुरात तरुणीचे भरदिवसा अपहरण करून सामूहिक बलात्कार | पुढारी

Gang Rape Nagpur : नागपुरात तरुणीचे भरदिवसा अपहरण करून सामूहिक बलात्कार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

गाण्याच्या क्लासला जाणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार (gang rape nagpur) करण्यात आल्याची संतापजनक घटना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये घडली.

गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील गुन्हेगारीच्या घटना चर्चेत असतानाच आता सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याने नागपूर हादरले आहे. नराधमांनी पीडित तरुणीचे रामदास पेठ सारख्या गजबजलेल्या भागातून अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या १९ वर्षीय तरुणीचे नराधमांनी शहरातून अपहरण केले आणि नंतर कळमना परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार (gang rape nagpur) केला. पीडित तरुणी गायनाचे क्लासेस करते. सोमवारी सकाळी ११ वाजता ही तरुणी क्लासेसला जात होती. यावेळी आरोपींनी रामदास पेठ येथे तरुणीला गाठून तिचे अपहरण केले. त्यानंतर नागपूर शहरातील कळमना परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केले.

दरम्यान, पीडितेने याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलिस उपअधीक्षक सीताबर्डी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी घटनेची माहिती घेतली.

याबाबत बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी, अशी तक्रार पोलिसांना मिळाल्याचे सांगितले. पीडित तरुणीचे गाण्याच्या क्लासला जात असताना अपहरण करण्यात आले. त्यानंतर कळमना पोलिस ठाण्यात याचा गुन्हा दाखल केला जात आहे. कुणालाही अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात असून आताच या प्रकरणाबद्दल जास्त माहिती देता येणार नाही, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button