यवतमाळ : ट्रकचालकांना अडवून २५ लाखांच्या औषधांसह रोख रक्कम लुटली | पुढारी

यवतमाळ : ट्रकचालकांना अडवून २५ लाखांच्या औषधांसह रोख रक्कम लुटली

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा

कारमधून पाठलाग करत आलेल्या तीन लुटारूंनी ट्रकचालकांना अडवून त्यांचे हातपाय बांधत त्यांना मारहाण केली. त्यानंतर ट्रकमधील माल व चालकांजवळ असणारी रोख रक्कम पळवली. यामध्ये त्यांनी तब्बल २५ लाख रुपये किंमतीचा औषधसाठा लंपास केला. पांढरकवडा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मराठवाकडी गावालगत ही घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कंटेनर चालक लखन जयराम जाटाव (वय २४, रा. तालोळी) व बालचंद सेन (रा. दाबली कला, जिल्हा राजगड) हे दोघे हैद्राबाद येथील रेड्डीज कंपनीचा औषधसाठा कंटेनरमधून नागपूरकडे घेवून जात होते.

बुधवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ते मराठवाकडी गावाजवळ आले असता, एका ट्रकने कंटेनरला अडवले. त्यानंतर त्या पाठोपाठ आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून तीघेजण उतरले. आणि कंटेनरचालकांना धमकावले.

त्यानंतर त्यांनी दोघांच्याही डोळ्यावर पट्टी बांधून, त्यांना खाली उतरविले. रस्त्यालगतच्या शेतात नेऊन दोघांचेही हातपाय बांधले. त्यानंतर औषधाने भरलेला कंटेनर कोंघारा गावालगत नेऊन त्यातील २५ लाख रुपये किमतीचा औषधसाठा या लुटारुंनी पळवून नेला.

दरम्यान, कंटेनर चालकांनी स्वत:ची कशीबशी सुटका करत घडलेली घटना कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि पांढरकवडा पोलिसांना कळवली. या घटनेची दखल घेत पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध ४९४ औषधांचे बॉक्स व केबिनमधील ६ हजार रुपये असा एकूण २५ लाख ६ हजार रुपयांचा माल लुटून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

लुटारूंच्या शोधासाठी तीन पथके

लुटारूंच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके गठीत करण्यात आली आहे. यातील एक पथक मध्य प्रदेश, तर दुसरे पथक हैदराबादकडे रवाना करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button